छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो): शहरात सध्या महानगरपालिका निवडणूकीमुळे राजकीय वातावरण आहे. त्यात राजकिय वातावरण सध्या तापलेले असताना राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे उमेदवार डॉ.मयूर सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाचा मंडप पेटविण्याची गंभीर घटना घडली आहे. कैलासनगर परिसरात प्रभाग क्रमांक १६ मध्ये आज पहाटे ४.३० वाजता मंडप जाळला असल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात नव्हे तर शहरात एकच खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. असले जीवाशी खेळ करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
महानगरपालिका निवडणुकीची धामधूम सुरू आहे. त्यात अनेकजण एकमेकांच्या जीवाशीच खेळ करत असल्याचा गंभीर प्रकार घडत आहेत. कैलासनगर येथील प्रभाग क्रमांक १६ मध्ये उमेदवार डॉ. मयूर सोनवणे यांच्या प्रचार कार्यालयाच्या मंडप पेटविला असल्याची घटना आज पहाटे घडली. आज या भागात नळाला पाणी आले असल्याने नागरिक जागी होते. त्यात मंडपाला आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ आग विझविली. यात बाजूलाच एका रूममध्ये बारा ते पंधरा कार्यकर्ते झोपलेले होते.
नागरिकांच्या सतर्कतेमुळे आग विझवली गेल्याने सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे उमेदवार डॉ. मयूर सोनवणे यांच्यासह कार्यकर्त्यांनी तात्काळ जिन्सी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ही घटना जाणीवपूर्वक घडवून आणल्याचा संशय व्यक्त केला जात असून, संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. राजकीय कार्यालयावर झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून असले प्रकार करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी आता सर्वत्र केली जात आहेत.













